Welcome to Yodha News   Click to listen highlighted text! Welcome to Yodha News
लोकल न्यूज़

संगमनेर पालिकेत ‘विकास 2.0’ची सुरुवात; वाढीव शुल्कांवरून शहरात संतापाची लाट

‘आता करावेच लागेल’ मोहीम सुरू; अर्थसंकल्पात दरवाढीचा शिक्का?


संगमनेर पालिकेत ‘विकास 2.0’ची सुरुवात; वाढीव शुल्कांवरून शहरात संतापाची ला
संगमनेर (प्रतिनिधी) – संगमनेर नगरपालिकेत यावेळी सत्यजित तांबे आणि बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष म्हणून मैथिली ताई तांबे यांनी पदभार स्वीकारत “विकास 2.0” मॉडेलची घोषणा केली आहे. संगमनेरच्या जनतेने त्यांना भरघोस मते देत सत्तेवर बसवले. काहींनी सत्यजित तांबे यांच्या व्हिजनवर विश्वास ठेवून मतदान केले, तर काहींमध्ये निवडणुकीदरम्यान विविध पातळ्यांवर ‘खुश’ केल्याच्या चर्चा शहरात रंगताना दिसतात.
तथापि, कायदेशीर व लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या या सत्ताधाऱ्यांवर आता चांगले काम करण्याचा मोठा दबाव आहे. जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांनुसार १ मार्चपासून शहरात अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम, स्वच्छता, फ्लेक्स बोर्ड, आरोग्य आदी सर्व क्षेत्रांत व्यापक मोहीम राबवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. “आता करावेच लागेल” अशी ठाम भूमिका घेत पालिकेने ८ प्रकारचे जनजागृती पोस्टर्स प्रसिद्ध केले आहेत.
मात्र या पार्श्वभूमीवर शहरात नव्या वादाला तोंड फुटले आहे. पालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी विविध परवाने, नोंदणी शुल्क आणि व्यावसायिक शुल्कात मोठ्या प्रमाणावर वाढ करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. पूर्वी अत्यल्प शुल्कात होणारी व्यवसाय नोंदणी आता ‘आवाच्या सव्वा’ दराने होणार असल्याची चर्चा व्यावसायिक व नोकरदार वर्गात सुरू आहे.
“विकासासाठी पैसा हवा हे मान्य; पण तो फक्त कष्टकरी, व्यावसायिक आणि सर्वसामान्यांच्या खिशातूनच का?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. वाढीव दरांची यादी सध्या प्रोव्हिजनल असल्याचे सांगितले जात असले तरी येत्या २३-२४ तारखेला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
शहरातील विविध व्यापारी संघटना व नागरिकांनी या वाढीव शुल्कांना तीव्र विरोध दर्शवला असून, जनआंदोलनाची तयारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. “जनतेच्या खिशावर डल्ला न मारता वास्तव व परवडणारे दर ठरवावेत,” अशी एकंदर भावना संगमनेरकरांतून व्यक्त होत आहे.
आता ‘विकास 2.0’ प्रत्यक्षात कसा राबवला जातो आणि वाढीव दरांबाबत सत्ताधारी काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!