संगमनेर न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील सुरक्षा चौकी सुविधाविरहित; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
संवेदनशील परिसरात मूलभूत सोयींचा अभाव; प्रशासनाकडे लक्ष देण्याची मागणी

संगमनेर
दि. १६ फेब्रुवारी २०२६
संगमनेर येथील अतिभव्य व अतिसुंदर तालुका व जिल्हा न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील सुरक्षा चौकी सध्या मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे चित्र समोर आले आहे. अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या परिसरात असलेली ही चौकी अपुऱ्या सुविधांमुळे दुर्लक्षित अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे.
न्यायालय परिसरात दररोज मोठ्या प्रमाणावर वकील, पक्षकार, कर्मचारी व नागरिकांची वर्दळ असते. तसेच वाहनांचीही मोठी ये-जा असते. मात्र, येथे सुरक्षेसाठी तसेच वाहनांच्या नियोजनासाठी कोणतीही व्यवस्था कार्यरत नसल्याचे आढळून येत आहे.

सदर सुरक्षा चौकीला कायमस्वरूपी दरवाजाची सुविधा नाही. सुरक्षारक्षकांसाठी बसण्याची योग्य व्यवस्था नसून, प्रकाशव्यवस्थाही अपुरी आहे. चौकीतील सर्व भिंतीना जाळे लागलेले असून, आत प्रवेश करण्यास अडथळ्यांची परिस्थिती निर्माण झाली आहे.
या परिस्थितीमुळे न्यायालय परिसरातील एकूणच सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, संभाव्य धोके लक्षात घेता ही बाब गंभीर मानली जात आहे. नागरिक, वकील व न्यायालयीन कर्मचारी वर्गाकडून याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
संबंधित प्रशासन, न्यायालयीन व्यवस्थापन तसेच वकील महासंघाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन सुरक्षा चौकीसाठी आवश्यक सुविधा, प्रकाशव्यवस्था, आसनव्यवस्था व अन्य सोयी तातडीने उपलब्ध करून घ्याव्यात, अशी मागणी होत आहे.
न्यायालयासारख्या संवेदनशील ठिकाणी सुरक्षित व सुव्यवस्थित वातावरण निर्माण करणे ही प्रशासनाची जबाबदारी असून, याबाबत लवकरात लवकर ठोस निर्णय घेण्यात यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

—————————




