संगमनेरात वीज थकबाकीदारांवर एमएसईबीची मोठी कारवाई
लाखो रुपयांची थकबाकी; २०–२५ कनेक्शनचे मीटर जप्त, वीजपुरवठा खंडित

दिनांक: ११ फेब्रुवारी २०२६
संगमनेर (प्रतिनिधी):
संगमनेर शहरातील मध्यवर्ती भागातील एका कॉलनीमध्ये अनेक वर्षांपासून वीज बिलाची थकबाकी न भरल्यामुळे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (एमएसईबी/महावितरण) यांनी मोठी कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कॉलनीतील सुमारे २० ते २५ वीज कनेक्शनधारकांकडे लाखो रुपयांची थकबाकी प्रलंबित होती.
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी संबंधित ग्राहकांना वारंवार लेखी व तोंडी सूचना दिल्याचे समजते. तसेच फोनद्वारे संपर्क साधून बिल भरण्याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र, तरीही थकबाकीची रक्कम न भरल्याने अखेर महावितरणच्या १५ ते २० जणांच्या पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन कारवाई केली.
या कारवाईदरम्यान संबंधित ग्राहकांच्या घरांमधील वीज मीटर जप्त करण्यात आले असून त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, एका देवस्थानाचे वीज मीटर देखील थकबाकीमुळे जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

या संदर्भात वरिष्ठ रिकव्हरी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी कारवाईची पुष्टी केली. त्यांनी सांगितले की, “संबंधित ग्राहकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी प्रलंबित होती. वारंवार सूचना देऊनही बिल न भरल्याने नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे.”
पुढील कार्यवाहीबाबत विचारले असता अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, “कोणत्याही प्रकारचा दबाव आला तरी संपूर्ण थकबाकीची रक्कम जमा झाल्याशिवाय वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येणार नाही,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
सदर कारवाईमुळे शहरात मोठी चर्चा रंगली असून थकबाकीदारांवर कडक भूमिका घेण्याचा संदेश महावितरणने दिल्याचे मानले जात आहे.




