व्यापाऱ्यांना दिलासा: प्रस्ताविक शुल्कवाढ न करण्याचे आमदार श्री. सत्यजित तांबे यांचे संकेत
व्यापारी असोसिएशन, योद्धा न्यूज फॉर जस्टीस व ‘सौ शहरी एक संगमनेर’ ग्रुपच्या पुढाकाराला यश

संगमनेर
दि. २२ फेब्रुवारी २०२६
संगमनेर नगरपालिकेमार्फत प्रस्तावित करण्यात आलेल्या व्यवसाय परवाना, नूतनीकरण व प्रस्ताविक शुल्कवाढीच्या विरोधात संगमनेर व्यापारी असोसिएशनच्या वतीने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. या संदर्भात आज सकाळी नगरपालिकेत व्यापारी व लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक पार पडली.
या बैठकीत व्यापाऱ्यांनी स्पष्ट भूमिका मांडत सांगितले की, प्रस्तावित दरवाढ अवास्तव असून ती लघु व मध्यम व्यापाऱ्यांना परवडणारी नाही. आधीच विविध कर, महागाई, वीज बिल, भाडे, कर्मचारी वेतन व इतर खर्चामुळे व्यवसाय अडचणीत असताना नव्याने शुल्कवाढ केल्यास व्यापारी वर्गावर मोठा आर्थिक भार पडेल. व संगमनेर जनतेने आपणास ज्या अपेक्षेने निवडून दिले त्यांचा भ्रमनिरास होईल व जन मत आपल्या विरोधात जाण्यासाठी आपणच कारणीभूत ठराल…
दरम्यान, या प्रस्तावित दरवाढीबाबत ‘योद्धा न्यूज फॉर जस्टीस’ या इम्पॅक्ट चॅनेल तसेच ‘सौ शहरी एक संगमनेर’ ग्रुपच्या माध्यमातून संगमनेरमधील व्यापारी व विविध व्यावसायिक ग्रुपपर्यंत ही माहिती वेळेवर पोहोचवण्यात आली होती. नगरपालिकेमार्फत होणाऱ्या शुल्कवाढीबाबत व्यापाऱ्यांना सतर्क करत संभाव्य आर्थिक भाराबाबत अलर्ट देण्यात आला होता.
तसेच व्यापारी असोसिएशन व त्यातील सर्व संचालकांशी पत्रव्यवहार व थेट संपर्क साधून, या दरवाढीमुळे व्यापाऱ्यांवर पडणाऱ्या अतिरिक्त आर्थिक भाराची माहिती देण्यात आली. यामुळे व्यापारी वर्गात जागरूकता निर्माण झाली आणि त्यानंतर सर्व व्यापाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन या विषयावर एकत्रित भूमिका मांडण्याचा निर्णय घेण्यात आला.

या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी आमदार श्री. सत्यजित तांबे यांच्याशी थेट संवाद साधत आपल्या भावना व्यक्त केल्या. “आपल्या निवडीत व्यापारी वर्गाचा मोठा वाटा असून, नव्या नेतृत्वाकडून दिलासादायक निर्णयांची अपेक्षा आहे,” असे व्यापाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले.
व्यापाऱ्यांच्या ठाम भूमिकेची दखल घेत आमदार सत्यजित तांबे यांनी यावर्षी कोणतीही दरवाढ न करण्याचे संकेत दिले. तसेच भविष्यात संतुलित व जनहितकारी धोरण राबवले जाईल, असेही त्यांनी आश्वासन दिले. बैठकीत विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली असून वातावरण सकारात्मक व खेळीमेळीचे राहिले.
या बैठकीस माजी व्यापारी असोसिएशन अध्यक्ष व मर्चंट बँक चेअरमन श्री. गोपाळ पडतानी, श्री. प्रकाश कलंत्री, श्री. प्रकाश राठी, बाहेती बंधू, शरद गांडोळे, भारत गॅस चे श्री. मधुसूदन नावंदर, पेट्रोल पंप संचालक श्री. मणियार,श्री. नरेंद्र चांडक,माजी नगरसेवक श्री. शशी मुळे,व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी श्री. अविनाश पूलाटे, व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री. सुमेध संत, श्री. गिरीश कालडा, श्री. ओमप्रकाश असावा, तसेच सर्व उपस्थित व्यापाऱ्यांनी एकत्रितपणे आपली बाजू ठामपणे मांडत दरवाढीविरोधात एकजूट दाखवली.
दरम्यान, आमदार सत्यजित तांबे यांनी १ मार्चपासून नगरपालिका प्रशासन अधिक शिस्तबद्ध पद्धतीने चालवले जाईल, अशी माहिती दिली. ठेकेदारी पद्धत बंद करून पोलीस विभागाच्या सहकार्याने गस्ती पथक कार्यान्वित करण्यात येणार असून, अतिक्रमण व बेकायदेशीर व्यवसायांवर पोलीस व नगरपालिका कर्मचाऱ्यांसह कठोर कारवाई केली जाणार आहे. तसेच शहर विकासासाठी विविध नवीन योजना राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीनंतर यावर्षी दरवाढ न होण्याचा निर्णय व्यापारी वर्गासाठी मोठा दिलासा ठरल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये व्यापारी असोसिएशन सोबतच ‘योद्धा न्यूज फॉर जस्टीस’ आणि ‘सौ शहरी एक संगमनेर’ ग्रुपच्या सक्रिय भूमिकेचेही योगदान महत्त्वाचे ठरल्याचे मत व्यक्त होत आहे.




