टिपू सुलतान संदर्भातील घोषणांप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात निवेदन; शांतता राखण्याचे आवाहन
भावना दुखावल्याचा आरोप; संबंधितांवर कारवाईची मागणी.
संगमनेर
दि. १६ फेब्रुवारी २०२६
संगमनेर येथे आज सकाळी काही संघटना व राजकीय पक्षांकडून करण्यात आलेल्या घोषणांबाबत तसेच टिपू सुलतान यांच्या छायाचित्राचा अवमान केल्याच्या कथित घटनेविरोधात मुस्लिम समाजातील तरुणांनी संगमनेर पोलीस ठाण्यात निवेदन सादर केले.
निवेदनात संबंधित घोषणांमुळे व कथित प्रकारामुळे समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचा उल्लेख करण्यात आला असून, अशा कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच गावातील शांतता व सामाजिक सलोखा अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने दक्षता घ्यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर पोलीस ठाणे परिसरात मुस्लिम समाजातील काही तरुणांची उपस्थिती दिसून आली. पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सर्व समाजातील धार्मिक व ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांचा मान राखला जावा, तसेच कोणत्याही प्रकारच्या आक्षेपार्ह कृतींना मोकळीक देऊ नये, अशी भावना व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, शहरातील सामाजिक सलोखा व भाईचारा अबाधित राहावा, यासाठी सर्व पक्ष, सर्व धर्म व सर्व विचारांच्या प्रतिनिधींनी संयम बाळगण्याचे व परस्पर आदर राखण्याचे आवाहन विविध स्तरातून केले जात आहे.
पोलीस प्रशासनाकडून प्रकरणाची नोंद घेऊन आवश्यक ती कायदेशीर पडताळणी केली जात असून, परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
संगमनेर शहरात शांततेचे वातावरण कायम राहावे, यासाठी प्रशासन व नागरिकांनी संयमित भूमिका घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
_______________________




