संगमनेरच्या विकासासाठी ‘जाहीरनामा 2.0’ यशस्वी करण्याच्या दिशेने सामाजिक कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण चर्चा
‘सौ शहरी एक संगमनेरी’ ग्रुपकडून पाच पानी निवेदन सादर, लोकसहभागातून विकासावर भर

संगमनेर शहराच्या सर्वांगीण व शाश्वत विकासासाठी नगराध्यक्ष मा. मैथिलीताई तांबे आणि आमदार मा. सत्यजित तांबे यांनी मांडलेल्या जाहीरनामा 2.0 च्या प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टीने शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी एक विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
हे चर्चासत्र मालपाणी लॉन्स, संगमनेर येथे पार पडले. कार्यक्रमास विविध सामाजिक संस्था, संघटनांचे प्रतिनिधी व जागरूक नागरिक उपस्थित होते. चर्चासत्रात पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य सुविधा, वाहतूक व्यवस्था, शिक्षण तसेच महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसह अनेक महत्त्वाच्या नागरी प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली.

या प्रसंगी राजेश मालपानी, गिरीशभाऊ मालपानी, वसंत बंदावणे, शफीभाई तांबोळी, योगेश कासट, अॅड. संग्राम जोंधळे, साळुंखे तसेच इतर मान्यवरांनी आपली मते मांडत, नागरिकांच्या समस्या प्रभावीपणे सोडवण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि समाज यांच्यात समन्वय आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.

संगमनेरच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या ‘सौ शहरी एक संगमनेरी’ या व्हॉट्सॲप ग्रुपच्या वतीने शहरातील विविध नागरी समस्यांबाबतचे पाच पानी निवेदन सादर करण्यात आले. गेल्या चार वर्षांपासून या ग्रुपच्या माध्यमातून अनेक समस्यांचा अभ्यास करून त्या यशस्वीरीत्या मार्गी लावण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी ‘सौ शहरी संगमनेरी’ ग्रुपचे प्रवर्तक व ‘योद्धा फोर जस्टीस’चे कार्यकारी संपादक यांनीही आपली भूमिका मांडली. जाहीरनामा 2.0 हा केवळ आश्वासनांपुरता मर्यादित न राहता, ठोस कृती, लोकसहभाग आणि कालबद्ध अंमलबजावणीद्वारे प्रत्यक्ष विकास साधणारा दस्तऐवज ठरावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
एकूणच, जाहीरनामा 2.0 च्या माध्यमातून संगमनेरच्या विकासाला नवी दिशा देण्यासाठी लोकसहभागावर आधारित धोरण राबवण्याचा ठाम निर्धार या चर्चासत्रातून व्यक्त झाला.




